निशब्द

काही शब्द राहून गेलेत,
ओठी आलेच नाहीत,
काही शब्द राहून गेलेत,
कोऱ्या कागदावर उमटलेच नाहीत..

कधी हिम्मत नाही झाली,
तर कधी वेळ चुकीची वाटली.
कधी गर्दीत सापडलो,
तर कधी स्वतःतच गुंतलो.
शब्द मनी आलेत
पण मग कुठेतरी विरघळून गेलेत.

काही सांगायचे आहे, सांगू तरी कसे?
शब्द ह्रिदयाच्या कोणत्या कोपऱ्यात लपून बसलेत.
ज्या शब्दांवर विश्वास करावा,
तेच नेमके दगा देऊन बसलेत..
8245692575_cc52879eb4_m

क्षणांनी भरारी घेतली, पण शब्दांनी नाही.
कंठात अटकून गेले,
कंठ दाटवून गेलेत.

निरोप घेताना हलकेसे हसू बरे,
थोडे अश्रू बरे.
शब्द सुचलेच नाही.
काही बोलावेसे वाटले,
पण आवाज निघालाच नाही.
निशब्द झालो, तसेच राहावेसे वाटले.
शब्द आलेत,
पण मग न बोललेले बरोबर वाटले.

– शंतनु घारपुरे

Advertisements

अनिश्चित

खूप दिवसाने मातृभाषेत कविता करावी वाटली. खूप वर्षांनी  शब्द मनी आलेत. खूप वर्षांनी शाई उमटवता आली.. थोडी वही रंगवता आली..

अनिश्चित

आयुष्यात सगळेच मिळेल का याची खात्री नाही..
गेले ते क्षण पुन्हा यावे असे वाटते खरी,
पण येतील का? खात्री नाही.

हरवलेल्या वाटा पुन्हा सापडतील का? खात्री नाही.
चातकासारखा वाट पाहतो खरी,
पाउस पडेल का? खात्री नाही.

विश्वास काय, अविश्वास काय, माहिती नाही.
मंदिरात जातो परि देव आहे का? खात्री नाही.

एका कुठल्या किनार्यावर तारकांना मोजत बसावे वाटते,
तिथेच लाटांच्या कल्लोळात झोपावे वाटते,
डोळे मिटून, स्वप्न बघावे वाटते,
पण झोप येईल का? खात्री नाही.

उगाच हसतो कधी, उगाच रडतो कधी,
सोबत हसायला, अश्रू पुसायला कोणी येईल का? खात्री नाही.

– शंतनु घारपुरे